
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

महसूल विभागामार्फत दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत असून याचाच एक भाग म्हणून रविवार दि. 3/08/2025 रोजी राळेगाव तालुक्यात “पांदण / शिव रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे” हा उपक्रम मोठया उत्साहात पुर्ण करण्यात आला.
शेतक-यांसाठी शेती उपयोगी अवजारे, साहीत्य व शेतमालाची ने आण करण्यासाठी पांदण / शिवरस्ते अतिशय महत्वाचे असल्याने सदरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची शासनाची भुमिका आहे. यासाठी दि. 3 ऑगस्ट रोजी राळेगाव तालुक्यातील राळेगाव ते चिकना, राळेगाव ते वा-हा , गुजरी ते मेंगापुर, आंजी आणि खडकी सु. ते निधा असे पाच अतिक्रमीत रस्ते मोहीम स्वरूपात शासकीय मोजणी करून अतिक्रमण मुक्त करण्यात आले. महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग व पोलिस विभाग यांनी अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी एकत्रित कार्यवाही केली. तसेच पांदण रस्ता खुला होणे हे सर्वच शेतक-यांच्या दृष्टीने फायदेशीर असून अतिक्रमण धारकांना स्वत:हून अतिक्रमण काढण्यासाठी समुपदेशन देखील करण्यात आले.
राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या “हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र” अभियानाअंतर्गत राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राळेगाव तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून सिताफळ, वड, कडुनिंब, चिंच, पिंपळ, बेल, इ. प्रकारचे एक हजार वृक्ष प्राप्त करून घेवून तालुक्यातील *राळेगाव ते चिकना, राळेगाव ते वा-हा , गुजरी ते मेंगापुर, आंजी, खडकी सु. ते निधा, टाकळी ते चिंचोली, उंदरी ते वनोजा, जागजई ते दापोरी, परसोडा ते मुधापुर, पिंपरी दुर्ग ते राळेगाव, मांडवा ते कोळवण, पिंपरी दुर्ग ते मांडवा, खडकी ते वडगाव, झुल्लर ते डोर्ली, खैरी ते मंगी, वरध ते घुबडहेटी, खैरगाव का. ते मोहदरी, पळसकुंड पारधी बेडा ते देवधरी, दहेगाव ते किन्ही ज., पिंपरी सा.ते मंगी आणि एकुर्ली ते वडगाव अशा एकुण 21 पांदण रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली.
वृक्षारोपण करण्यासाठी राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार अमित भोईटे, पोलिस निरिक्षक शितल मालते, उपअधिक्षक भूमी अभिलेख भारत गवई , सर्व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने श्रमदानातून वृक्षारोपण असा अभिनव उपक्रम पार पाडला.
सदरचा उपक्रम हा शेतक-यांच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने या उपक्रमाला संपूर्ण तालुक्यात गावोगावी आसपासचे शेतकरी व लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला.