
जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार नांदेड

सततच्या पावसाने माहूर येथील ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या महाकाली बुरुजाची तटसंरक्षक भिंत 19 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताचे सुमारास ढासळली. त्याची मोठमोठी दगडं दत्तशिखर रोडवर येऊन पडली.सुदैवाने यावेळी भाविकांसह नागरिकांच्या वाहनाची ये -जा नसल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. ही माहिती कळताच माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड, शासकीय बांधकाम विभाग, तहसीलदार अभिजीत जगताप व स्थानिक दुकानदार यांनी कर्मचाऱ्यांकरवी ती मोठमोठी दगडं बाजूला सारून रहदारीसाठी रस्ता मोकळा करून दिला. माहूरशहर व परिसरात पुरातत्व विभागाचे 13 संरक्षित स्मारके असून त्यावर देखरेख करण्यासाठी एकही कर्मचारी तैनात नाही. त्यामुळे पडझडीसह अन्य अनुचित प्रकाराकडे साफ डोळेझाक होत असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील ऐतेहासिक किल्ल्याच्या संवर्धणासाठी शासन फारच सजग असल्याचा आव आणत आहे. त्यासाठी करोडो रुपये खर्च केल्याचे दर्शवून आपली पाठ थोपटून घेत आहे. प्रत्यक्षात मात्र समुद्र सपाटीपासून 2600 फुट उंचावर असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील रामगड या किल्ल्याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची प्रचिती तट संरक्षक भिंत कोसळल्याने सहजच येते. असा दुर्मिळ ठेवा जपून ठेवणे काळाची गरज आहे. परंतु यासाठी शासन मागील काळात करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवत आहे. मात्र त्यावर देखरेख करण्यासाठी कुणीही नसल्याने कोणते काम झाले, अन नेमके कुठे झाले? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरितच आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे अंतर फार दूर असल्याने पुरातत्व विभागाचे रामगड किल्ल्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात हा अमूल्य ठेव्याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. अशी भीती इतिहास प्रेमी नागरिकांतून होत आहे. दरम्यान किल्ल्याची भिंत ढासळली, त्यावेळी श्री दत्तशिखर मंदिर मार्गावरून भाविकांसह येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. पडलेले मोठमोठे दगडं हटविण्याचे काम माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
तसेच असे प्रत्येक पावसाळ्यात वारंवार दरड कोसळून कोणतेही जीवित हानी होणार नाही याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असे नागरिकातून चर्चा होत आहे.