रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात अमोल कोमावार यांची उपसभापतीकडे लेखी तक्रार

प्रतिनिधी, यवतमाळ
वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पातील उत्खननादरम्यान काढण्यात आलेले गौण खनिज खुले बाजारात विकून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविण्यात आला. सदर गौण खनीज भ्रष्टाचार प्रकरण आता विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गेले आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिका-यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अहवाल सादर होऊ नये तसेच प्रकरण दडपण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी तसेच कंत्राटदारांनी मिळून उपसभापती यांच्या पीएस सोबत साटेलोटे केल्याचा आरोप करीत त्याची हकालपट्टी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता अमोल कोमावार यांनी विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांचेकडे केली आहे.
अमोल कोमावार यांनी 30 जुलै 2025 रोजी विधानसभा भवन, मुंबई येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पातील खनिज उत्खननातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले होते. महसूल विभाग व रेल्वे विकास निगमने एकत्रित तपासणी करून, उत्खननातून प्रत्यक्षात किती रॉयल्टी भरली आणि शासनाला किती महसूल मिळायला हवा होता याचे तुलनात्मक कॅलक्युलेशन करून एका महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, असे आदेश उपाध्यक्षांनी दिले होते. मात्र 30 दिवसाची मुदत संपूनही अहवाल न दिल्याने आता या प्रकरणावर नवे वादळ उठले आहे. सुरुवातीला सरकारी अधिका-यांनी यवतमाळ जिल्हयात पुरपरिस्थिती असल्याचे कारण समोर करुन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चालविला. आता मात्र दबाव वाढल्याने काही भ्रष्ट अधिकारी तसेच कंत्राटदारांनी मिळून उपसभापती यांचे खाजगी सचिव यांनाच गळाला लावल्याचा आरोप अमोल कोमावार यांनी केला आहे. याबाबत सविस्तर तक्रार करुन खासगी सचिव संतोष परदेशी यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोट्यवधीचा भ्रष्टाचार
यवतमाळ रेल्वे लाईनवरील मुरुम व गौण खनिज सब कंत्राटदारांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून खुले बाजारात विकले. रेल्वे विभागाच्या कॅलक्युलेशननुसार या उत्खननाची किंमत तब्बल १२,००० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा कोमावार यांचा दावा आहे. दरम्यान ३३ किमी पैकी केवळ ५ किमी क्षेत्राचीच इटीएस मोजणी झाल्याचे उघड झाले. उर्वरित क्षेत्रात किती उत्खनन झाले, किती महसूल बुडाला याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. सदर प्रकरणात काही कंत्राटदारांना लाखो रुपयांचा दंड झाला आहे. ईटीएस मोजणी झाल्यास अधिकारी आणि कंत्राटदारांचे भांडे फुटणार असल्याने साम दाम दंड भेद चा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे माजी खासदार आ.भावनाताई गवळी यांनी सुध्दा रेल्वेतील भ्रष्टाचाराबाबत तक्रारी केल्या होत्या.
तक्रारदाराला फसविण्याचा प्रयत्न
कोट्यवधीच्या भ्रष्टाचार प्रकरणात तक्रारदार मागे हटायला तयार नसल्याने आता त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तक्रारदाराने फक्त ईटीएस मोजणी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु काही केल्या अधिकारी ईटीएस मोजणी करुन कारवाई करायला तयार नाही. सदर प्रकरणात अधिकारी पातळी सोडून वागण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे सीबीआय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.

