रेल्वे गौण खनीज प्रकरणात तक्रारी नंतर विधानसभा उपाध्यक्षांची कारवाई

मुख्य संपादक गोपाल गौरवाड
अधिकारी व कंत्राटदारांकडून पीएस ला गळाला लावण्याचा प्रयत्न, रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात अमोल कोमावार यांची विधानसभा उपाध्यक्षांकडे लेखी तक्रार या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी त्यांचे खासगी सचिव यांची रवानगी आपल्या मुळ जागेवर केली आहे. वर्धा यवतमाळ नांदेड या नविन रेल्वे प्रकल्पामधील गौण खनीज भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला असून विधानसभा उपाध्यक्षांनी सदर प्रकरण मेरीटवर घेतल्याने लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळत आहे.
वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनीज भ्रष्टाचार प्रकरण आता विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गेले आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिका-यांना सविस्तर अहवाल एका महिण्याच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अहवाल सादर होऊ नये तसेच प्रकरण दडपण्यासाठी काही दोषी अधिकारी तसेच कंत्राटदारांनी मिळून विधानसभा उपाध्यक्ष यांच्या खाजगी सचिवासोबत साटेलोटे केले. याबाबत भनक लागताच तक्रारदार अमोल कोमावार यांनी सविस्तर तक्रार उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचेकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत खाजगी सचिव संतोष परदेशी सह संचालक, वित्त व लेखा यांची प्रतिनियुक्ती रद्द करीत त्यांना वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे प्रत्यावर्तीत करण्यात आले आहे.
चौकशीला येणार गती
अमोल कोमावार यांनी 30 जुलै 2025 रोजी विधानसभा भवन, मुंबई येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पातील खनिज उत्खननातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले होते. महसूल विभाग व रेल्वे विकास निगमने एकत्रित तपासणी करून, उत्खननातून प्रत्यक्षात किती रॉयल्टी भरली आणि शासनाला किती महसूल मिळायला हवा होता याचे तुलनात्मक कॅलक्युलेशन करून एका महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, असे आदेश उपाध्यक्षांनी दिले होते. मात्र 30 दिवसाची मुदत संपूनही अहवाल देण्यात आला नाही. मध्यंतरी अतिवृष्टीचे कारण देऊन टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर काही दोषी कंत्राटदार तसेच अधिका-यांनी खाजगी सचिवाला गळाला लावण्याचा प्रयत्न केला. आता खाजगी सचिवाच्या जागेवर आनंद रामटेके यांची खाजगी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकरण तातडीने लावण्याचे आदेश अण्णा बनसोडे यांनी दिले आहे.
- कोट्यवधीचा भ्रष्टाचार
यवतमाळ रेल्वे लाईनवरील मुरुम व गौण खनिज सब कंत्राटदारांनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून खुले बाजारात विकले. रेल्वे विभागाच्या कॅलक्युलेशननुसार या उत्खननाची किंमत तब्बल १२,००० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा कोमावार यांचा दावा आहे. दरम्यान ३३ किमी पैकी केवळ ५ किमी क्षेत्राचीच इटीएस मोजणी झाल्याचे उघड झाले. उर्वरित क्षेत्रात किती उत्खनन झाले, किती महसूल बुडाला याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. सदर प्रकरणात काही कंत्राटदारांना लाखो रुपयांचा दंड झाला आहे. ईटीएस मोजणी झाल्यास अधिकारी आणि कंत्राटदारांचे भांडे फुटणार आहे.

