
प्रतिनिधी विशाल येलोरे केळापूर

शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी
मोहदा येथून जवळच असलेल्या कोच्ची येथील ५८ वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १५ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे कोच्ची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत शेतकऱ्याचे नाव शालिक कवडू अक्कलवार (वय ५८) असे असून, ते शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या शेतातील जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेले होते. त्यांचे शेत सर्वे क्र. ४७ मध्ये आहे.दरम्यान, परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले व पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. आसरा घेण्यासाठी शालिक अक्कलवार शेतातील टिनाच्या झोपडीत गेले. मात्र त्याचवेळी विजेचा मोठा लख्खडाट झोपडीवर कोसळला व विजेचा प्रवाह थेट त्यांच्या अंगावर पडला.विजेचा प्रहार इतका तीव्र होता की, शालिक अक्कलवार यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती महसूल विभाग व पोलिस प्रशासनाला दिली. घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे.
शालिक अक्कलवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोच्ची व परिसरात शोककळा पसरली आहे.
वीज पडून झालेल्या मृत्यूबाबत शेतकरी कुटुंबीयांनी शासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी देखील या घटनेबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष घालून आकस्मिक मदत रक्कम तत्काळ मंजूर करावी, अशी मागणी केली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.