
प्रतिनिधी/राळेगाव : नरेश राऊत

राळेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सलग दोन मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत उकलला असून, यवतमाळ शहरातून तिघा आरोपींना अटक करून चोरीस गेलेल्या दोन्ही बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.पहिल्या प्रकरणात, अपराध क्रमांक 296/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अंतर्गत फिर्यादी समीर संतोषराव कोकुलवार, रा. बहारे लेआउट, राळेगाव यांची किंमत अंदाजे ₹1,00,000/- असलेली बुलेट मोटरसायकल (क्र. MH 34 ES 3222) चोरीस गेली होती. तर दुसऱ्या प्रकरणात, अपराध क्रमांक 297/2025 कलम 303(2) अंतर्गत फिर्यादी तूफेल जमेल शेख, रा. नवीन वस्ती, राळेगाव यांची किंमत ₹1,00,000/- असलेली बुलेट मोटरसायकल (क्र. MH 49 AQ 2546) चोरीस गेली होती.
चोरीस गेलेल्या वाहनांचा व आरोपींचा शोध घेण्यात असताना, पोलीस स्टेशन लोहारा यांच्या माहितीच्या आधारे, यवतमाळ शहरातून दिनांक 07/08/2025 रोजी आरोपी निलेश श्रावण मुनेश्वर (वय 32, रा. सालोड, जि. यवतमाळ),
आदित्य प्रकाश राऊत (वय 20, रा. यवतमाळ) आणि गणेश विलास उले (वय 19, रा. शिरोली, ता. घाटांजी)
यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून दोन्ही बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
चौकशीत उघड झाले की, आरोपी हे अशा मोटरसायकलींना लक्ष्य करत होते ज्यांचे हँडल लॉक लावलेले नसते. ते थेट वाहन सुरू करून घेऊन जात असत. या पार्श्वभूमीवर, राळेगाव ठाण्याच्या ठाणेदार शितल मालटे यांनी नागरिकांना आपल्या मोटरसायकली सदैव हँडल लॉक करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक शितल मालटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक योगेश दंडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक गोपाल मास्टर, पोलीस नाईक सुरज चिव्हाणे आणि अविनाश चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडली.