तालुक्यातील चिंचोली शिवारातील घटना

राळेगाव प्रतिनीधी :- नरेश राऊत
एका वयोवृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी पहाटे सातच्या दरम्यान उघडकीस आली.
मारोती गणपत आत्राम वय ५८ वर्ष राहणार आठमुर्डी असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आठमुर्डी येथील मारोती आत्राम यांचे चिंचोली शिवारात शेत आहे,शेती कामानिमित्त ते पहाटेच्या दरम्यान शेतात गेले होते.
अचानक मारोती आत्राम यांचा मुलगा राहुल आत्राम हे शेतामध्ये फवारणी करण्याकरिता गेला असता त्याचे वडील
रोहिणीच्या झाडाला गळफास लावून असल्याचे दिसले. त्याने ही माहिती वडकी पोलिसांना दिली तात्काळ घटनास्थळी बीट जमादार अमोल चौधरी यांनी घटनास्थळा भेट दिली व मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आला आहे.
मृतक मारोती आत्राम यांचेकडे आठ एकर शेती असून त्यांचेवर दोन लाखाचे कर्ज असल्याचे कुटुंबांनी सांगितले
मारुती आत्राम यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा दोन मुली व नातवंड असा आप्तपरिवार असून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे.
राळेगाव तालुक्यातील आठ ते दहा सतत दिवसात अंदाजे चार ते पाच शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे व शेतकऱ्यांची दखल घेऊन नुसकान भरपाई व कर्ज माफी द्यावी अशी राळेगाव तालुक्यातील जनतेची मागणी आहे

