
प्रतिनिधी बंडू भारसकरे वडकी

राळेगाव:-तालुक्यातील वनोजा येथील एका ४२ वर्षीय महिलेचा वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वनोजा येथे गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० दरम्यान उघडकीस आली.
लिलाबाई बालाजी कोडापे वय ४२ वर्ष राहणार वनोजा तालुका राळेगाव असे शॉक लागून मृत्यू झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार वनोजा येथील लिलाबाई कोडापे ही महिला गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक रॉड विसर्जन हीटर वापरत होती.सकाळी आंघोळीकरिता पाणी गरम करण्याकरिता तिने हिटर चालू केले व गरम करण्याचे काम संपल्यानंतर तिने पाणी गरम झाले की नाही म्हणून बादलीमध्ये हात टाकला असता तिला विजेचा जोरात धक्का बसला व खाली पडली.तेवढ्यात घराबाजूच्या काही नागरिकांनी लगेच धाव घेतली आणि पाहिले असता लिलाबाईचा एक हात चालू हिटर असलेल्या बाटलीतील पाण्यामध्ये होता त्यावरून तिला हिटरचा करंट लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले,तेव्हा नागरिकांनी लाईन बंद केली व लीलाबाईला तात्काळ ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नेले असता मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.काही वर्षांपूर्वी लिलाबाईच्या पतीचे निधन झाले होते त्यामुळे लिलाबाई ही रोज मजुरी करून जीवन जगायाची, लिलाबाईच्या पश्चात एक मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे.