प्रतिनिधी पवन जाधव यवतमाळ

कळंब :-राळेगाव व कळंब तालुक्याच्या सीमेवर एम-प्लस सोलर ऊर्जा प्रकल्प तब्बल ७०० एकरांवर उभारण्यात आला असून, शेकडो शेतकऱ्यांकडून सुपीक जमीन भाडे तत्वावर बळकावली गेली आहे. या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
अशीच घटना उमरी येथील शेतकरी दिवाकर वनारसे (वय ५०) यांच्या बाबतीत घडली आहे. वनारसे यांच्या ६ एकर शेतीपैकी ३ एकर शेतजमीन एम-प्लस कंपनीकडून कराराद्वारे घेण्यात आली. त्या बदल्यात वर्षाला दीड लाख रुपये भाडे देण्याचे ठरले. मात्र उर्वरित ३ एकर शेतीचा करार करण्यासाठी कंपनीचे अधिकारी रुपेश लुथरा यांनी दबाव आणला. सुरुवातीला ३० वर्षांचा करार करून ४० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले, पण नंतर शब्द फिरवत फक्त
२० लाख रुपये देऊन उर्वरित २० लाख नंतर देऊ असे सांगण्यात आले.
लुथरा यांच्या बोलण्यावर विश्वास नसल्याने वनारसे यांनी करार करण्यास नकार दिला. कारण यापूर्वीही अशाच पद्धतीने इतर शेतकऱ्यांची अशिक्षितपणाचा फायदा घेत फसवणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. करार न झालेल्या सर्वे नंबर १८३ मधील शेतात कंपनीने काम सुरू केले असून दोन हंगाम पूर्ण होऊनही वनारसे यांना एकही रुपया मोबदला मिळालेला नाही. परिणामी ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
“जगण्याचे साधन असलेली
सुपीक ओलिताची जमीनच बळकावली गेली, मोबदला मिळाला नाही, जमीन परत मिळाली नाही… त्यामुळे आता सहनशक्ती संपली आहे,”
असे म्हणत वनारसे यांनी अखेर ३ सप्टेंबर रोजी एम प्लस ऊर्जा कंपनीच्या उमरी येथील ऑफिससमोर सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलिस अधीक्षक, तहसीलदार कळंब, पोलिस निरीक्षक कळंब तसेच मतदारसंघाचे आमदार व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांना दिले आहे.
वनारसे यांना भीती आहे की, “करारावर सही न केल्यास मला
मारून टाकले जाईल,” असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, २ सप्टेंबरपर्यंत करार न केल्यास ३ सप्टेंबर रोजी सहकुटुंब आत्मदहन करावे लागेल.दरम्यान, प्रकल्प सुरू करण्यासाठी सुरुवातीला उमरी गावातील सरपंचालाच एम-प्लस कंपनीने पकडले आणि शेकडो शेतकऱ्यांची जमीन बळकावली.
यामुळे एम-प्लस ऊर्जा प्रकल्पाच्या अन्यायकारी धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आगामी काळात या प्रकल्पाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र सुपरफास्ट नूज साठी पवन जाधव यवतमाळ

