
कार्यकारी संपादक निरंजन नलगे

काल ढगफुटी सदृश्य पावसाने ढाणकी व परिसरात अक्षरशः थैमान घातले होते. यात अनेक शेतकऱ्यांची उभी पिके सुद्धा खरडून गेली. सावळेश्वर येथील जवळपास आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. ते एवढे प्रचंड होते की एखाद्या नदीचा पूर घरात शिरावा आणि होत्याचं नव्हतं व्हावं. सदर कुटुंब हे अत्यंत गोरगरीब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारी कुटुंब असून, अक्षरशः खाण्याच्या अन्नधान्याचा सुद्धा यामुळे नासोडा झाला.ही वस्तुस्थिती सावळेश्वर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे तालुका पर्यावरण प्रमुख,विवेक रावते यांनी रोहित वर्मा यांना फोन करून सांगितली. अशा परिस्थितीत आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने एकमेकांच्या मदतीस मानवाने धावले पाहिजे. आपल्याकडून जी शक्य होईल ती मदत पीडितांना आपण केली पाहिजे. “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” संत तुकोबारायांच्या ओळींची आठवण करून देत, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा यांनी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या आदेशाने, सदर गोरगरीब उध्वस्त झालेल्या कुटुंबांना आपल्या परीने छोटीशी का मदत होईना म्हणून, अन्नधान्याची किट वाटप केले. सर्वांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. आणि शासनाकडून आपणास योग्य ती मदत मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बाळू योगेवार भाजप ढाणकी शहराध्यक्ष,वैभव कोठारी भाजपा तालुका सचिव,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे विवेक रावते, शुभम बाभुळकर,सावळेश्वर येथे नुकतीच सर्व्हे करण्यासाठी आलेली प्रशासकीय टीम,सरपंच सावळेश्वर यांसह सावळेश्वर चे ग्रामस्थ उपस्थित होते.