सिमेंट वाहतूक करणारे ट्रक सुसाट; प्रवाशांच्या जीवितास धोका — प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यातील वाई बाजार फाट्यावरून सिमेंटची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक ट्रक भरधाव वेगाने ये-जा करत असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाई बाजार फाट्यावर तातडीने गतीरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी प्रवासी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वाई बाजार फाटा हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रवासी केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी परिसरातील जवळपास वीस खेडेगावांतील नागरिक बसची प्रतीक्षा करण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने येतात. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची येथे मोठी गर्दी असते. नांदेड, यवतमाळ, नागपूर, पुसद, आदिलाबाद यासह विविध शहरांकडे जाण्यासाठी अनेक प्रवाशांना वाई बाजार फाट्यावर बसची प्रतीक्षा करावी लागते.
मात्र, याच मार्गावरून सिमेंटची वाहतूक करणारे मोठे ट्रक तसेच इतर अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फाट्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने एखाद्या क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विशेषतः बसची प्रतीक्षा करताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अगदी जवळून अवजड वाहने वेगाने जात असल्याने धोका अधिक वाढला आहे. सणासुदीच्या काळात तसेच सकाळ-संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी प्रवाशांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते.
गतीरोधकासह वाहतूक नियंत्रणाची मागणी
वाई बाजार फाट्यावर तातडीने गतीरोधक बसविण्यासोबतच वेगमर्यादेचे फलक लावावेत, पोलिसांकडून अधूनमधून तपासणी करावी आणि भरधाव वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अवजड वाहनांच्या चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देणेही आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी आणि वाई बाजार फाट्यावर गतीरोधक बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.

