वाई बाजारात पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव शेतकरी आर्थिक संकटात
प्रतिनिधि भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर आधीच निसर्गाच्या अवकृपेने संकट कोसळले असताना, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काबाडकष्ट करून पिकविलेल्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाई बाजार येथील कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत शेतकऱ्यांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निसर्गाच्या संकटानंतर व्यापाऱ्यांचाही फटका
शेतकरी वर्षभर शेतात घाम गाळून कापसाचे पीक घेतो. बियाणे खत कीटकनाशके मजुरी मशागत आणि इतर खर्चाची मोठी रक्कम खर्च करावी लागते.
मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर उरलेला कापूस विक्रीसाठी बाजारात आणला असता अपेक्षित दर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला कधी
एकीकडे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा कर्जाची परतफेड कशी करावी आणि पुढील हंगामाची तयारी कशी करावी असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाई बाजार परिसरातील कापूस खरेदी व्यवहारामध्ये पारदर्शकता असावी कापसाला योग्य प्रत्यक्ष करून त्याला रास्त दर मिळावा आणि शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक पिळवणूक होऊ नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज
कापूस खरेदीच्या व्यवहारावर संबंधित यंत्रणेने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळतो की नाही याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव हमीभाव आणि शासकीय खरेदी व्यवस्थेबाबत स्पष्ट माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या संकटाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याला बाजारपेठेतही न्याय मिळत नाही, तर शेती व्यवसाय टिकवणे अधिक कठीण होईल. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.

