प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
श्रीक्षेत्र माहुर नांदेड़
राज्यभर निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती, वाढते तापमान आणि घटता पाणीसाठा लक्षात घेता ग्रामीण भागात यंदा पाणीटंचाईची परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे व काटकसरीने वापर करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील पाणीसाठा किंवा जलाशयातील पाणीसाठा राखीव ठेवणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ विनाकारण सुरू ठेवून पाणी वाहू देऊ नये. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळांची गळती आढळल्यास ती तातडीने दुरुस्ती करावी. वाहने, अंगण, परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा.
दैनंदिन गरजेनुसार आवश्यक तेवढेच पाणी वापरून उर्वरित पाण्याची बचत करावी तसेच घरगुती वापरातून पाण्याची नासाडी रोखावी.
पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आज आपण जपलेला प्रत्येक थेंब उद्याची पाणीटंचाई कमी करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे.

