प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
शेकडो मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
श्रीक्षेत्र माहूर येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मागील काही आठवड्यात शेकडो मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आठवडी बाजार चोरट्यांसाठी कुरण बनला असून ग्राहकांच्या खिशाला लाखोंचा फटका बसत आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे खिशातून मोबाईल पाकीट लांबवत आहेत. शेतकरी महिला तरुण व्यापारी असे अनेकजण या चोरीला बळी पडत आहेत. अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी चोरटे सापडत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजारात पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. चोरट्यांना आळा घालण्यासाठी बाजारात विशेष पथक तैनात करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
आठवडी बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत व चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.

