माहूर तालुक्यासह परिसरात तापमानाचा पारा ३५ अंशांवर; उष्णतेमुळे जनजीवन प्रभावित
प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यासह परिसरात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांसह शेतकरी आणि शेतमजूर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस जाणवणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत असून, दैनंदिन जनजीवनावरही त्याचा परिणाम होत आहे.
शेतीच्या कामांसाठी शेतात जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना वाढत्या उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खरीप हंगामातील शेतीची विविध कामे सुरू असताना उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतात काम करणे जिकिरीचे होत आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने शेतमजुरांना काम करताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.
माहूर हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्वाचे बाजारपेठेचे केंद्र असल्याने विविध गावांतील नागरिक खरेदी-विक्री तसेच अन्य कामांसाठी येथे येतात. मात्र वाढत्या तापमानामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनाही उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने नागरिक शक्यतो बाहेर पडणे टाळत आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, उन्हात काम करताना मधूनमधून विश्रांती घ्यावी आणि शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.
एकीकडे शेतीची कामे आणि दुसरीकडे वाढता उन्हाचा तडाखा, अशा दुहेरी परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

