प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर येथील श्री रेणुका माता आणि महाकाली माता यांच्या धार्मिक परंपरेचा भावपूर्ण संगम पाहायला मिळाला. अष्टमीच्या निमित्ताने श्री रेणुका देवीच्या वतीने महाकाली मातेला निमंत्रण देण्यासाठी पुजारी मंडळींनी धार्मिक परंपरेनुसार उपस्थिती लावली. यावेळी महाकाली मंदिरात महाआरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी एकवीरा देवी संस्थानचे परंपरागत विश्वस्त योगेशराव जोशी यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
एकवीरा देवीच्या सेवेसाठी जोशी कुटुंबीयांनी तीन पिढ्यांपासून आपली परंपरा अखंडपणे जपली आहे. योगेशराव जोशी यांचे आजोबा, त्यानंतर त्यांचे वडील आणि आता स्वतः योगेशराव जोशी देवीची सेवा आणि धार्मिक परंपरेचे जतन करण्याचे कार्य करीत आहेत. महाकाली देवी मंदिर परिसरात आवश्यक सोयी-सुविधांची कमतरता असतानाही जोशी कुटुंबीयांनी देवीच्या सेवेला प्राधान्य देत आपली परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्यातून देवीप्रती असलेली श्रद्धा आणि निष्ठा दिसून येते. महाकाली मातेला निमंत्रण देण्यासाठी आयोजित या धार्मिक सोहळ्यात श्री रेणुका देवीच्या वतीने महाआरतीसाठी पुजारी मंडळी उपस्थित होती. यामध्ये विश्वस्त दुर्गादास भोपी, शुभम भोपी, पिंटू काना, मकरंद यांच्यासह अन्य विश्वस्त आणि श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक राऊत सर यांचा सहभाग होता. या सोहळ्याच्या माध्यमातून देवीच्या धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडले. विविध धार्मिक परंपरांमधील परस्पर सन्मान आणि देवीच्या सेवेसाठी असलेली निष्ठा या निमित्ताने अधोरेखित झाली. या भक्तिमय उपक्रमामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

