नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या निवेदनाची आरोग्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडून दखल; जिल्हा शल्यचिकित्सकांना आवश्यक सूचना
प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
श्रीक्षेत्र माहूर आदिवासीबहुल व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेल्या माहूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न आता थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक आणि अधिपरिचारिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णसेवेवर ताण निर्माण होत असल्याची बाब नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिली. सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) माहूरगडावर आलेल्या आरोग्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी नांदेडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना आवश्यक सूचना दिल्याने रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आता ठोस कार्यवाही होणार का, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
माहूर तालुका हा डोंगराळ, आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांमधील गोरगरीब नागरिक उपचारासाठी प्रामुख्याने माहूर ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र, याच रुग्णालयात महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने आरोग्यसेवेची कार्यक्षमता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे पद २० जानेवारी २०२६ पासून रिक्त असून, सहाय्यक अधीक्षकांचे पददेखील अनेक महिन्यांपासून भरलेले नाही. त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी निवेदनातील प्रश्नांची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, केवळ सूचना देण्यापुरतीच ही बाब मर्यादित न राहता प्रत्यक्ष रिक्त पदे भरून रुग्णालयातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रुग्णालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेत आणखी भर पडली ती अधिपरिचारिकांच्या बदलीमुळे. रुग्णालयात कार्यरत सात अधिपरिचारिकांपैकी पाच जणींची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून न देता त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, रुग्णांना वेळेवर आणि आवश्यक त्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय आरोग्यसेवा सक्षमपणे मिळणे अत्यंत आवश्यक असताना रुग्णालयातील महत्त्वाची पदे रिक्त राहणे ही चिंतेची बाब असल्याचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी निवेदनातून अधोरेखित केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, आवश्यक संख्येने अधिपरिचारीका उपलब्ध करून द्याव्यात, तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष कार्यवाहीची प्रतीक्षा
माहूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा प्रश्न थेट आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने प्रशासनाच्या पुढील भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनानंतर जिल्हा आरोग्य प्रशासन किती तत्परतेने हालचाली करते, रिक्त पदे कधी भरली जातात आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे निर्माण झालेल्या अडचणी कधी दूर होतात, याकडे माहूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

