नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
माहूर तालुक्यात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १०.३० या वेळेत करण्यात येणारे भारनियमन तात्काळ बंद करून आवश्यक असल्यास ते दिवसा करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख जितू चोले यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सायंकाळच्या वेळेत होणाऱ्या वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत असून महिलांच्या घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर विपरीत परिणाम होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढत असल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीचे भारनियमन टाळणे आवश्यक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
महावितरणने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सायंकाळी होणारे भारनियमन तात्काळ स्थगित करून आवश्यक असल्यास दिवसा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा पर्याय स्वीकारावा, तसेच परिस्थितीचा स्वतंत्र आढावा घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संबंधित नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

