प्रतिनिधी इंद्रजीत नेवारे माहूर
महसूल विभागातील प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाजामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांचा महसूल दिनानिमित्त आज (दि. ६ ऑगस्ट) नांदेड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या सन्मानाची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर माहूर तालुक्यासह जिल्हाभरातून
तहसीलदार अभिजीत जगताप यांनी महसूल विभागातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी नागरिकांची कामे वेळेत मार्गी लावणे, प्रशासनातील शिस्त आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यावर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यामुळे महसूल प्रशासनाची कार्यक्षमता वाढल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांसह विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याची परंपरा असून, यंदा नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अभिजीत जगताप यांचा गौरव होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे माहूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रामाणिकपणा कर्तव्यदक्षता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.

