नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
माहूर शहरातील बुलेट दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास तात्काळ थांबविण्यात यावा, शहरातील प्रत्येक महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढवावी तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूर तालुका यांच्या वतीने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, शहरात काही बुलेट दुचाकींमध्ये सायलेंसरमध्ये बदल करून मोठ्या आवाजात वाहन चालविले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी.
तसेच शहरातील विविध महाविद्यालय परिसरात छेडछाड व टवाळखोरीच्या घटना टाळण्यासाठी नियमित पोलीस गस्त ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
हे निवेदन निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूर तालुका यांच्या वतीने सादर करण्यात आले असून, पोलीस प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

