नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
माहूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनेक वर्षांपासून रखडलेले अनुदान तात्काळ त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावे, अन्यथा येत्या ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून लाभार्थ्यांसह बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे यांनी मुख्याधिकारी, नगर पंचायत माहूर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, माहूर शहरातील सन २०१८ ते २०२५ या कालावधीत विविध डीपीआरअंतर्गत मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे शासकीय अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यापूर्वी या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगर पंचायत प्रशासनाने संबंधित विभागाकडे निधीची मागणी करून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित वित्त निबंध प्राधिकरण कार्यालय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याशी बोलणे करून दिले व नगरपंचायत मार्फत 3 कोटी 67 लाख रुपये निधीची मागणी केल्यास तात्काळ नगरपंचायत ला वर्ग होईल व त्यामधून माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील असे सांगितले होते. अशी कार्यालयाकडून निधीची मागणी करण्यात असली तरी आजपर्यंत एकाही लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान जमा झाले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून लाभार्थ्यांसह पुन्हा बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आनंद पाटील तुपदाळे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार तथा पोलिस निरीक्षक, माहूर यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.

