प्रतिनिधी प्रदीप शेरकुरवार
माहूर : 11 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य पथके, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक प्राथमिक उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहे.
उत्सव काळात १२० विशेष बसेस धावणार असून, सुमारे २ हजार अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी सेवा बजावणार आहेत. भाविकांना सुरक्षित आणि सुकर सेवा मिळावी, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संपूर्ण व्यवस्थेची कमान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राहणार आहे. नवरात्रोत्सवात भाविकांच्या आरोग्य, सुरक्षा आणि आवश्यक सेवा-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

