प्रतिनिधि भीमाशंकर सूर्यवंशी
माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत मागील काळातील विविध धार्मिक सण व उत्सव शांततेत, सुव्यवस्थित आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या नागरिक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि वृत्तपत्रांच्या पत्रकारांचा आज, ८ ऑक्टोबर रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी पोलीस हद्दीतील विविध गावांमध्ये बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. सण-उत्सवाच्या काळात डीजे व डॉल्बीच्या अतिवापरामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी नियमांचे पालन केले.
या काळात पत्रकार बांधवांनी बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती केली, तर पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाला थेट सहकार्य केले. यामुळे सण-उत्सव अत्यंत शांततेत पार पडले.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वयामुळेच सण-उत्सव शांततेत पार पडले. पत्रकार, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.संतोष जोंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिंदखेड
या कृतज्ञता सोहळ्यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, भविष्यातील उत्सवही सामाजिक सलोखा राखून साजरे करण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

