प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
भक्तिमय वातावरणात रविवारपासून शारदीय महोत्सवास प्रारंभ
आदिशक्ती देवी दुर्गेच्या आराधनेचा, भक्तीचा आणि शक्तीजागराचा पवित्र शारदीय नवरात्रोत्सवास रविवार दि. ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये देवीच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. त्याकरता माहूरगडावरून रेणुका ज्योत नेण्यासाठी दररोज युवकांचे ताफे दाखल होत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सिध्देनाथ मित्र मंडळ जिजापूर (ता. सांगोला जि. सोलापूर) येथील दोनशे युवक माहूरगडावरून रेणुका ज्योत घेऊन गेले आहेत. या युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही माहूरच्या रेणुका मातेकडून ज्योत नेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध गावांमधून युवकांचे ताफे माहूरगडावर दाखल होत आहेत. ज्योत घेऊन गेल्यानंतर संबंधित गावांमध्ये तिची विधिवत स्थापना करून भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाला सुरुवात केली जाणार आहे.
नवरात्र हा केवळ धार्मिक उत्सव नसून वाईटावर चांगल्याचा, अन्यायावर न्यायाचा विजय तसेच स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर करणारा उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना करून देवीची स्थापना केली जाते.
शक्ती उपासनेची महत्त्वपूर्ण परंपरा
माहूरगडावरून ज्योत पेटवून नेण्याची परंपरा ही देवीभक्तांच्या श्रद्धेचा आणि शक्ती उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. माहूरच्या रेणुका मातेचे आशीर्वादरूपी तेज आपल्या गावात घेऊन जाऊन नवरात्रोत्सवाची सुरुवात करण्याची भावना या परंपरेमागे आहे. ज्योत ही आदिशक्तीचे तेज, सामर्थ्य आणि अखंड भक्तीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला आपल्या गावात पोहचेल अशा नियोजनाने विविध गावांतील युवक माहूरगडावर येऊन भक्तिभावाने भवानी ज्योत घेऊन जातात.
नऊ दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवण्यासह दुर्गासप्तशतीचे पठण आरती भजन जागरण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
विशेष म्हणजे माहूरगडावरून ज्योत आपल्या गावाकडे पायी नेली जाते. देवीच्या ज्योतीला अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे प्रतीक मानून युवक मोठ्या भक्तिभावाने माहूरगडावरून ज्योत घेऊन आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. प्रवासादरम्यान देवीचे नामस्मरण, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात हा प्रवास केला जातो. माहूरच्या रेणुका मातेचे आशीर्वादरूपी तेज आपल्या गावात घेऊन जाण्याची श्रद्धा या परंपरेमागे आहे.

