कारवाई न झाल्यास आमरण उपोषण; डॉ. रमेश पाटील (गावंडे) आक्रमक
प्रतिनिधी रघुनाथ धनवे
वाई बाजार : येथील मुख्य बसस्थानकापासून गावातील बसस्थानकापर्यंत असलेले अतिक्रमण सात दिवसांच्या आत हटविण्यात यावे, अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश पाटील (गावंडे) वाईकर यांनी दिला आहे.
या मागणीचे निवेदन दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक श्री. नागमवाड यांच्याकडे देण्यात आले. वाई बाजार येथील मुख्य बसस्थानक ते गावातील बसस्थानक या मार्गावरील अतिक्रमणांमुळे एसटी बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, उद्यापासून गावात एसटी बससेवा सुरू होणार असल्याने गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी, शेतमजूर तसेच सर्व ग्रामस्थांनी बस वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. रमेश पाटील (गावंडे) यांनी केले आहे.
गावात येणाऱ्या एसटी बसची वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी, यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावावा; अन्यथा सात दिवसांची मुदत संपल्यानंतर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाई बाजार हा तालुक्यातील महत्त्वाचा व्यापारी व वाहतूक केंद्र असून मुख्य बसस्थानकापासून गावातील बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर दुकाने, फेरीवाले, शेड, पत्र्यांचे बांधकाम आदी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे एसटी बस तसेच इतर वाहनांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ही समस्या लवकरात लवकर सोडवून बसस्थानक परिसर मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थांकडूनही होत आहे.

