प्रतिनिधी रघुनाथ धनवे
यावर्षीच्या पावसाळ्यात माहूर तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले, सिंचन तलाव उच्च पातळी बंधाऱ्यात पुरेसा पाणी साठा झालाच नाही. परिणामी संभावित पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नदी, तलाव तसेच विविध पाणी प्रकल्पांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दि. 3 ऑक्टो. रोजी दिलेल्या निर्देशावरून तहसीलदार अभिजित जगताप यांनी मंडळ अधिकारी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता/शाखा अभियंता ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस उप निरीक्षक यांचे पथक नेमून त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
माहूर तालुक्यातील नदी उच्च पातळी बंधारे मणिरामध प्रकल्प लसनवाडी पाझर तलाव भोरड पालाईगुडा प्रकल्प शे. फ. वडारा तलाव असोली सांडवा तलाव आदी जलस्रोतांमधून पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी महसूल मंडळनिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. माहूर, सिंदखेड वानोळा व वाई या महसूल मंडळांसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जलस्रोतांवरील पाण्याचा अनधिकृत उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी बंद ठेवणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारींची तपासणी करणे तसेच अनधिकृत विद्युत जोडणी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण कारवाईवर महसूल पाटबंधारे, महावितरण व पोलीस विभागाने समन्वयाने लक्ष ठेवावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करावा असे आदेश तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिले आहेत.

