प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
श्री क्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. नवरात्रोत्सवात भक्तांची वाढणारी गर्दी दर्शनाची ओढ आणि भाविकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन श्री रेणुकादेवी संस्थानने डिजिटल सुविधांच्या माध्यमातून भक्तसेवेचे नवे दालन खुले केले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थाने अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत केले असून ११ ऑक्टोबरपासून ते भाविकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेणुकामातेचे दर्शन ते पार्किंगची माहिती आरोग्य सुविधा ते आपत्कालीन मदत अशा अनेक सुविधा आता एका क्लिकवर मिळणार आहेत. संकेतस्थळावर श्री रेणुकादेवीच्या गाभाऱ्यातील लाइव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान होणाऱ्या महाआरती, छबिना, कुमारिकापूजन यांसह विविध धार्मिक विधींचे व्हिडिओ अपडेटसही भाविकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, नऊ दिवस नऊ आरत्या आणि नऊ अष्टके यांची दैनंदिन माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष माहूरगडावर पोहोचता न येणाऱ्या भाविकांनाही घरबसल्या भक्तिभावाचा अनुभव घेता येईल. नवरात्रोत्सवात माहूरगडावर येणाऱ्या भाविकांना वाहतूक आणि पार्किंगची माहिती मिळवताना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी संकेतस्थळावर एसटी बससेवेचे वेळापत्रक पार्किंगची माहिती आणि लाइव्ह मॅपद्वारे दिशादर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय आरोग्य सुविधांची ठिकाणे आपत्कालीन सेवांची माहिती आणि लाइव्ह मॅपही उपयुक्त ठरणार आहेत.

