(नांदेड जिल्हा प्रतिनिधी) अनिल माडपेलीवार
माहूर शहरातील सर्व सेतू सुविधा केंद्रांवर विविध प्रमाणपत्रांच्या सेवा शुल्काचे शासनाने निश्चित केलेले अधिकृत दरफलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, माहूर तालुका यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेतू सुविधा केंद्रांमध्ये उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर, ज्येष्ठ नागरिक, अधिवास आदी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारले जातात. मात्र अनेक केंद्रांवर शासनाने निश्चित केलेल्या सेवा शुल्काचे दरफलक लावलेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून काही ठिकाणी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
नागरिकांना शासनमान्य सेवा शुल्काची स्पष्ट माहिती मिळावी, व्यवहारात पारदर्शकता यावी तसेच आर्थिक फसवणूक किंवा गैरसमज टाळण्यासाठी सर्व सेतू केंद्रांवर अधिकृत शुल्काचे दरफलक दर्शनी ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी तपासणी करून दरफलकाची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

