नांदेड जिल्हा प्रतिनिधी अनिल माडपेलीवार
माहूर तालुक्यातील गुंडवळ ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, दलित वस्ती विकास निधीचा गैरवापर, घरकुल योजनेतील कथित अनियमितता आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती परिसर, माहूर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
उपोषणकर्त्यांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कायद्यांनुसार कारवाई करावी, ग्रामपंचायतीच्या मागील तीन वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करावे, तसेच घरकुल लाभार्थ्यांकडून झालेल्या कथित वसुलीची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
उपसरपंच राहुल सतपाल कांबळे, बाबू विश्वनाथ खंदारे आणि ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत असून, चौथ्या दिवशीही उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अद्याप प्रशासनाकडून ठोस निर्णय जाहीर झालेला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही तहसील कार्यालय परिसरात आंदोलन शांततेत सुरू असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

