SIR प्रक्रियेला विरोध; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आघाडीचे प्रश्न
प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
नांदेड :देशातील लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत INDIA आघाडी तथा महाविकास आघाडीच्या नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) ‘संविधान वाचवा’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून महात्मा गांधी स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक व आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले.
देशात राबविण्यात येत असलेल्या SIR प्रक्रियेला आघाडीने तीव्र विरोध दर्शविला. या प्रक्रियेमुळे मतदारांच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मतदानाचा अधिकार हा भारतीय लोकशाहीचा मूलभूत आधार असून तो अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, त्यामुळे मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असणे अत्यंत आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरही महाविकास आघाडीने गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच देशभरातील SIR प्रक्रिया रद्द करण्यास यावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
या मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नांदेड जिल्हा शाखेने आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकारीणी सदस्य तसेच पक्षाच्या सदस्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांनी हे आवाहन केले होते. त्यानुसार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग नोंदविला.
Save Democracy’ आणि ‘संविधान वाचवा’चा नारा देत लोकशाही आणि मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ११ वाजता निघालेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा आयोजकांनी केला.
देशातील लोकशाही, संविधान आणि सर्वसामान्य नागरिकांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार असून, SIR प्रक्रियेविरोधात आघाडीचा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

