प्रतिनिधी भीमाशंकर सूर्यवंशी
यावर्षी पावसाअभावी माहूर तालुक्यातील खरीप पिकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने माहूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या संयुक्त चमूच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रगती पथावर आहे. अशी माहिती तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली.
माहूर तालुक्यातील चारही मंडळात यंदाच्या खरीप हंगामात १७८७ हेक्टरवर कापूस, १०६१६ हेक्टरवर सोयाबीन, ३९७४ हेक्टरवर तूर, १२९ हेक्टरवर मूग, ९६ हेक्टरवर उडीद अशी ३३१७-५ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे, परंतु यावर्षी सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने वरील सर्व पिकांना मोठा फटका बसला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन काढणे सुरु असून एकरी दोन ते तीन क्विंटल यापेक्षाही कमी उतारा येत आहे. त्यापेक्षा खर्च अधिक झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ते पीक घाट्याचा सौदा ठरले आहे.
शासनाने माहूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने महसूल कृषी विभाग व ग्रामपंचायत अधिकारी यांची संयुक्त चमू पंचनामे करण्यात गुर्क आहेत. तालुक्यात खरीप पिकांचे किती नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती मिळणार हे पीक पाहणी प्रयोग व संयुक्त चमूचा अहवाल यावर निर्भर असणार आहे. शासनाच्या निकषानुसार पंचनाम्यावर प्रत्येक शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य असल्यामुळे संयुक्त चमूला अहवाल सादर करण्यास विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी पर्यंत नुकसान भरपाई मिळेल की नाही तूर्तास याची शाश्वती देणे कठीण होऊन बसले आहे.

