महाविकास आघाडी पुरस्कृत डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा पदवीधरांच्या प्रश्नांवर भर; जाहीरनाम्यात रोजगार, शिक्षण व शिक्षकांच्या मागण्यांना प्राधान्य
प्रतिनिधी प्रदीप शेरकुरवार
श्रीक्षेत्र माहूर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी पदवीधर मतदारांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत आपली भूमिका मांडली आहे. शिक्षण, रोजगार, शिक्षक व प्राध्यापकांचे प्रश्न, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक तसेच ग्रामीण भागातील पदवीधरांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात आला आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाला पक्षाचे प्रचार निरीक्षक बसवराज पाटील, डॉ. नरेंद्र काळे, माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवरावजी किन्हाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा जाहीरनामा
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारपत्रकातून पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा देणे, ग्रंथालय व ई-ग्रंथालयांची व्यवस्था, रोजगार मेळावे आणि रोजगार पोर्टलच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळवून देण्यावर भर देण्यात आला आहे.
शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही जाहीरनाम्यात विशेष भूमिका मांडण्यात आली आहे. वेळेवर वेतन, अनुदान व थकबाकी, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना न्याय, यूजीसी वेतनश्रेणी, सीएएस पदोन्नती, पीएच.डी. वेतनवाढ तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सुविधांवर भर
मराठवाड्यात उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयआयटी व आयआयएमसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेचा मुद्दा जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, नीट परीक्षेसंदर्भातील अडचणी आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
डॉक्टर, वकील आणि विविध व्यावसायिकांच्या समस्या, कर्मचारी व कष्टकरी वर्गाच्या प्रलंबित मागण्या, सेवाविषयक प्रश्न तसेच शेतकरी आणि ग्रामीण मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांनाही प्रचारपत्रकात स्थान देण्यात आले आहे.
पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार
मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारातून व्यक्त करण्यात आला आहे. पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे व्यासपीठ असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये हालचाली वाढल्या असून, पदवीधर मतदारांपर्यंत जाहीरनाम्यातील मुद्दे पोहोचविण्यावर भर दिला जात आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारासाठी पक्ष संघटना सक्रिय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

