प्रतिनिधि भीमाशंकर सूर्यवंशी
सायबर जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांसाठी सायबर गुन्हेगारीबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) संतोष जोंधळे यांनी इंटरनेटचा वापर सुरक्षित व जबाबदारीने करण्याचे आवाहन केले. हा उपक्रम पोलीस अधीक्षक व माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली पार पडला.
OTP, ATM PIN, UPI PIN, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नका, अनोळखी व्यक्तींचे फोन, व्हिडिओ कॉल, लॉटरीचे आमिष किंवा पार्ट-टाईम जॉबच्या नावाने येणाऱ्या बनावट मेसेज आणि फिशिंग लिंकवर क्लिक करणे टाळा, सोशल मीडियावर प्रायव्हसी सेटिंग्ज मजबूत ठेवा, अनोळखी व्यक्तींची ऑनलाइन मैत्री स्वीकारू नका आणि वैयक्तिक फोटो शेअर करताना खबरदारी घ्या. अश्या प्रकारच्या काही महत्वपूर्ण ऑनलाइन सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स जोंधळे यांनी दिली. सपोनि जोंधळे यांनी तरुण पिढीमध्ये वाढती व्यसनाधीनता, सायबर बुलिंग, ऑनलाइन गेमिंगचे दुष्परिणाम आणि गेमिंग ॲप्समुळे होणारे आर्थिक नुकसान यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?सायबर फसवणूक झाल्यास अजिबात वेळ न दवडता त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. घटनेनंतर तातडीने तक्रार केल्यास आर्थिक नुकसान रोखण्यास मोठी मदत होते. इंटरनेटचा वापर करताना सतर्क राहून स्वतःसोबतच कुटुंबीय आणि समाजाचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करावे, असे आवाहन शेवटी सपोनि जोंधळे यांनी केले.

