प्रतिनिधि भीमाशंकर सूर्यवंशी माहूर
माहूर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि. ३० सप्टेंबर रोजी वर्ग सुरू असताना छताच्या तुळईचा काही भाग अचानक कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत ४ ते ५ विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शाळेची इमारत खूप जुनी झाली असून इमारतीच्या दुरवस्थेकडे यापूर्वीच लक्ष वेधण्यात आले होते. सुदैवाने यावेळी मोठी जीवितहानी टळली असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे माहूर तालुका अध्यक्ष प्राचार्य मधुसिंग जाधव सर यांनी शाळेतील मुख्याध्यापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली.
भविष्यात अशी मोठी दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि जुन्या शाळेच्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

